ब्रॅंडस च्या लोगो ची ऐशी तैशी..
व्यवसाय करायचा म्हणलं की खूप गोष्टी येतात.मग त्याची सुरवात ही त्याच्या नावापासून होते आणि मग प्रश्न पडतो तो म्हणजे त्या नावाला साजेश्या लोगो अर्थात ट्रेडमार्क बाबत….कारण जेव्हा तुमचा व्यवसाय मोठा होऊन नावाने ओळखला जातो तेव्हा ग्राहक सर्वात आधी ट्रेडमार्क कडे पाहतो व तोच ट्रेडमार्क हा बाजारातली तुमची ओळख ठरतो. म्हणून प्रत्येक व्यावसायिक कंपनीला आपला लोगो सर्वात उत्कृष्ट व आकर्षक कसा करावा असा प्रश्न पडतो. आज आपण अश्याच जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या काही कंपन्यांचे लोगो व त्या लोगो च्या मागे असणारा त्यांचा उद्देश जाणून घेऊया…
◆ Google – गूगलचा लोगो संपूर्ण जगातील सर्वात नामांकित ब्रँडपैकी एक आहे.गूगलच्या लोगोमध्ये एक गोष्ट तपासली जाऊ शकते ती म्हणजे रंगांची निवड….! लोगो डिझायनर रूथ केदार याने अतिशय विचारपूर्वक असे प्राथमिक रंग वापरले आहेत. फक्त “L” मधील हिरवा रंग सोडला तर बाकी अक्षरे ही प्राथमिक रंगात आहेत. ह्यातून गूगलला हेच सांगायचे आहे की , ” गूगल कंपनी ही नियमांनुसार खेळत नाही उलट नियम तोडून मजा करण्यास प्राधान्य देते.”
◆ Amazon – आज अमेझॉन ही सर्वात विश्वस्त अशी ऑनलाइन वस्तू विकणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. बरीचशी जुनी असलेली ही कंपनी आज जगभर प्रसिद्ध आहे.आपल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जगभर ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या या कंपनीचा ट्रेडमार्क तयार करताना त्यांनी Amazon हे इंग्रजी अक्षरात नाव टाकलं असून यात आपल्याला एक रेषा दिसते जी A या अक्षरापासून चालू होऊन Z या अक्षरावर संपते.हा लोगो A ते Z या नावाने चालू होणाऱ्या सगळ्या वस्तू मिळतील अस दर्शवतो. तसेच या सरळ ओळीत असणाऱ्या लोगो मध्ये त्यांनी एक हास्यखळी दाखवण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून त्यांच्याकडून खरेदी केल्याने ग्राहक हा आनंदी होईल.
◆ Nike – हा लोगो एवढा प्रसिद्ध आहे की , तुम्हाला या लोगो च्या सोबत कंपनी च नाव नसेल तरी तुम्ही ओळखाल. याचा अर्थ असा की त्या कंपनीने लोकांच्या मनात घर केलं आहे किंवा ते लोकांपर्यंत पोहचले आहे अस आपण म्हणू शकतो. पण कदाचित तुम्हाला या “बरोबरची खुण” (√) असणाऱ्या लोगो चा अर्थ माहीत नसेल.Nike ही वास्तविक पाहता ग्रीक देवी आहे जी विजयाच मानचिन्ह असल्यासारखी आहे. १९७१ साली लोगो तयार करताना कर्लीन डेव्हीडसन हिने त्या देवीचा पंख हा हालचाल व वेग या उद्देशाने कंपनीच्या नावासोबत जोडला.तिचा तो निर्णय अत्यंत योग्य ठरला.त्याचेच फळ म्हणजे आज लोकांच्या मनावर ठामपणे बिंबवला गेलेला तो Nike चा ट्रेडमार्क…!
◆ Burger King – जगातील दुसऱ्या क्रमांकाची फास्टफूड चेन ची कंपनी म्हणून आज बर्गरकिंग कडे पाहिलं जात.जर तुमचा ब्रँड एवढा मोठा असेल तर ट्रेडमार्क सुद्धा तेवढाच आकर्षक आणि समर्पक असणारच ना..! या लोगोत दोन बन पावाच्या मध्ये असलेल मांस काढून त्या जागी बर्गर किंग हे नाव टाकण्यात आलं जेणेकरून जेव्हा त्यांच्या प्रसिद्ध बर्गर हॅम्बर्गर चा विषय येतो तेव्हा तो राजा आहेच व तो राहील हे उदघोषीत होते.बाहेर असलेली निळी रेषा ही सर्व सजीवसृष्टी ने व्यापलेल्या मंडळाला आकर्षित करते असा त्याचा अर्थ आहे.
◆ Coca Cola – शीतपेय म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर कोका कोला हेच येत. शीतपेय निर्मितीत अग्रेसर असलेला तसेच पुरातन काळापासून चालत आलेल्या या ब्रँड ने आपला लोगो सुरवातीला जसा होता तसाच आज सुद्धा ठेवलेला आहे. त्यात थोडेसे सुधार सोडता विशेष काहीच बदल करण्यात आलेला नाहीये. जेव्हा १९८६ साली या लोगो ची पहिली आवृत्ती निर्माण करण्यात आली तेव्हाचा हा हस्तलेखनाचा नमुना आहे. आजच्या घडीला कितीही बदल घडत असले तरी सुद्धा आपल्या विशेष शैलीवर कोका कोला ने कुठलेही बदल केलेले नाहीत व ते आपल्या दर्जावर आजही ठाम आहेत.या लोगोची सर्वात निराळी गोष्ट ही आहे की , जेव्हा जगभर त्या लोगोचा अनुवाद केला जातो तेव्हा कुठल्याही ठिकाणी ग्राहक यास ओळखू शकतात.
◆ Instagram – हे अँप साधारणपणे ऑर्कुट च्या नंतर आलेलं. तुम्हाला कदाचित हे आठवत असेल की २०१० पासून या अँप ची निर्मिती झाली आहे व केवळ फोटो टाकण्याचा हेतू या अँप चा होता.फोटोग्राफर लोकांच्या प्रेक्षकांना आवडावा म्हणून हा लोगो आधी तपकिरी रंगाचा होता.पण जेव्हा २०१६ साली त्यांच्या अँप चा वाढलेला वापर आणि त्यात आलेली विविधता पाहून त्यांनी या लोगो ला थोडंस बदलण्याचा निर्णय घेऊन आपला चेहरा बदलण्याचे ठरवले. कारण त्यांच्या प्लॅटफॉर्मवर मोठ-मोठे व्यावसायिका,मॉडेल तसेच कलाकार लोक हे अँप वापरायला लागले होते.मग त्या नंतर २०१६ साली इन्स्टाग्राम च्या अँप चा लोगो बदलण्यात आला व तो ज्या प्रमाणे सगळ्या प्रकारचं साहित्य आहे त्या प्रमाणे मिश्र रंगसंगतीचा करण्यात आला.
◆ Dove – आजच्या घडीला सौंदर्यप्रसाधनांचा वाढता वापर तर आपण अनुभवत आहोत. त्यात नानाविध प्रकारची अत्तरे, सुगंधी तेल किंवा अंगाची साबण हे सगळं आपण वापरतच आहोत. तर या प्रसाधनांपैकी साबणाचे उत्पादन करणाऱ्या Dove या कंपनी च्या बोधचिन्हाबद्दल आपण जाणून घेऊया. Dove च्या लोगो मध्ये असणारा आकार हा आपल्याला पक्षाच प्रतिबिंब दर्शवतो तसेच त्यांची कंपनी शांतता,सौम्यता व शुध्दता दाखवते. डव्ह हा निळ्या अक्षरात असणारा शब्द विश्वासार्हता व उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. तर पिवळ्या रंगाचा पक्षी हा आनंद व समृद्धी ला सूचित करतो.अर्थातच सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या ब्रँड चा महिलांनी विचार करावा म्हणून हा लोगो परिपूर्णच आहे.
Share this content: